प्रिय सुमित (आत्ताचा मुलांचा आणि माझा पण बाबा),
तर पत्र लिहिण्यास कारण कि (हो .. हो ... असं एकदम दचकू नको) फॉर्मॅलिटी रे .... ते पत्र लिहिताना असतेच ना म्हणून , म्हटलं लिहावं तुला.... नाही तरी सध्या आपण डायरेक्ट बोलतोच ... पण आठवत का तुला आपण असे पण क्षण अनुभवले आहे कि त्यावेळेला तू मला आणि मी तुला ग्रीटिंग्स आणि त्या बरोबर एक पत्र लिहून पाठवायचो .
कसलं भारी वाटायचं ...... ते उघडून वाचे पर्यंत तर मला इतकी हूर हूर असायची आणि कधी एकदाच वाचते हे सगळं ,,, काय लिहिलं असशील तू ... असं खूप काही एकदम वाटायचं , आधाश्या सारखं सगळं पटा पटा वाचायचे मी ....
तुला आठवत कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी आपण भेटायचो ... बस स्टॅन्ड ला .... (आता जाम हसू येत आठवलं कि , बस स्टॅन्ड का तर येणारे जाणारे हे आजू बाजूला असणाऱ्या लोकं कडे कमी लक्ष द्यायचे आणि बस कडे जास्त म्हणून ) आत्ता चल ना एकदा जाऊन बसू परत त्याच स्टॅन्ड ला .. खूप वाटत परत ते दिवस यावे .. मी माझ्या ladybird
सायकल वर आणि तू तुझ्या
Hercules वर यायचो ,,,, आता नको पण…. मी आणि तू नाही झेपणार त्या सायकल ला.
तुला आठवत कॉलेज संपल्यावर आपण घरी सांगायचं ठरवलं होत . भीती वाटत होती मला आई बाबा "नाही" तर म्हणणार नाही ना ... ते movies मध्ये दाखवतात …..तस मला कोंडून ठेवतील. तुला भेटू देणार नाहीत वैगरे ... सॉलिड फिल्मी वाटत होत मला . पण आई बाबानी खूप छान समजून घेतलं आपल्याला . फक्त एक अट होती त्यांची दोघांनी पण जॉब शोधायचा आणि मग लग्न . त्यावेळेला खूप राग आला होता त्यांचा पण आता कळतंय कि आपली खूप काळजी आहे त्यांना आणि आपल्यावर विश्वस देखील .
तो जॉब शोधण्याचा एका वर्षाचा काळ होता ना त्यात आपण मला आठवत फक्त दोनदाच भेटलो होतो ... मी ना तेव्हा एक कविता लिहिली होती.
आहे मनोहर परी गमते उदास
चांदणी हि रात्र , वर रातराणीचा सुवास
पूर्ण चंद्र नभात , चांदण्याची बरसात
एकटीच तळ्याकाठी पाहे साजणाची वाट
हूर हूर मनात , वाटेकडे डोळ्यांची आस
वाऱ्याची झुळूक देइ , मनाला आभास
तळ्यातही चांदण्या आहे चंद्राच्या सवेत
आहे मनोहारी रात्र परी गमते उदास
मस्त ना सुचायच मला तेव्हापासूनच ..
तुला आठवतो आपला लग्ना नंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे ,,, धम्माल केली होती . आपण
अगदी सुट्टी टाकून सकाळी मस्त वैशाली मध्ये मसाला डोसा , नंतर डायरेक्ट सिंहगड ,तिकडून
संध्याकाळी खडकवासला च्या पाण्यात मस्त पाय
सोडून बसलो होतो अगदी अंधार पडे पर्यंत तिथेच
होतो . काय भारी वातावरण होत. फुल्ल टू रोमँटिक
आपलं नातं ना काळानुसार , सुख दुःख च्या ओढा ओढीत खूप मस्त फुललं . संसाराच्या
ऊन सावलीने आपल्याला खूप काही शिकवलं , घडवलं, समजूतदार बनवलं. कधी कधी चा लटका राग
आणि मोहक रोमॅंटिक रात्री पण मला अजूनही आठवतात आणि अंगावर शहारा येतो
आपलं हे असं फुलणं , उमलण , एकमेकांना समजून घेणं ह्या मुळेच असेल कदाचित खूप छान
चाललंय आपलं आज १४ वर्ष लग्नाला झाली पण तरी असं वाटत ना कि आत्ता तर प्रेमात पडलो आपण.
कधी भांडण ,कधी रुसवा फुगवा
कारण तुझ्यात जीव गुंतला
कधी कठीण असे क्षण , कधी
त्रासलेल मन
तरीही तुझ्यातच जीव गुंतला
कधी तूझ खरं, तर कधी माझं
खरं
पण तुझ्यात जीव गुंतला
कधी तुझं ताणून धरण, कधी
माझं सोडून देणं
कारण तुझ्यात जीव गुंतला
कायम तुझीच असणारी,
मी