mazionjal

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

पहिला पगार… ❤️

 


पहिला पगार… ❤️

आजच्या काळात महिन्याच्या पगाराची तारीख म्हणजे EMI, bills, घरखर्च आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस असतो.

पण पहिला पगार तसा नसतो…

पहिला पगार म्हणजे एक वेगळीच भावना असते.

आपल्या कष्टाची पहिली कमाई हातात आलेली असते.

रक्कम किती आहे यापेक्षा,

“ही माझ्या कष्टाची कमाई आहे.”

ही भावना मनात असते.

तो पगार हातात घेताना नकळत आई-बाबांचा चेहरा आठवतो…

आणि मनात कुठेतरी एक छोटासा विचार येतो—

“आता मीही काहीतरी करू शकते…” ❤️

पण माझा पहिला पगार म्हणजे नेमका कोणता?

याची एक छोटीशी, पण माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे.

माझी पहिली कमाई – १०० रुपये!

१० वीची परीक्षा झाल्यानंतरची गोष्ट.

त्या सुट्टीत मी एका कॉम्प्युटर क्लासमध्ये Instructor म्हणून दोन महिने काम केलं. खरं सांगायचं तर तिथे मी शिकतही होते आणि शिकवतही होते.

त्यांनी माझी संपूर्ण क्लासची फी माफ केली होती.

दोन महिने काम केल्यानंतर त्यांनी मला १०० रुपये पगार दिला.

आजच्या काळात १०० रुपये ही फार मोठी रक्कम नाही.

पण तेव्हा?

ते १०० रुपये म्हणजे माझ्यासाठी खूप भारी होते!

कारण ते फक्त १०० रुपये नव्हते.

ती माझ्या कष्टाची पहिली कमाई होती.

मला अजूनही आठवतं…

पैसे हातात मिळाल्यावर मी ते सगळ्यात आधी आईला जाऊन दिले.

पण माझ्यासाठी त्या दिवशी मी पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभी राहिल्यासारखं वाटलं होतं.

“मी कमावले!”

या दोन शब्दांचीच तेव्हा किती मोठी किंमत होती!


मग आली पहिली Official Salary…

यानंतर शिक्षण पूर्ण झालं.

MBA झाल्यावर पुण्यात नोकरी शोधण्यासाठी माझे खूप प्रयत्न सुरू होते.

दोन-चार महिने नोकरीचा शोध घेतला.

त्या काळात अनेक वेगवेगळे अनुभव आले.

काही गमतीदार, काही निराश करणारे, तर काही आयुष्यभर लक्षात राहणारे.

त्याबद्दल कधीतरी नंतर सविस्तर लिहीन.

पण माझी पहिली official job मिळाली ती धुळ्यातील Sinic Electronics मध्ये.

नवीन नोकरी…

नवं ऑफिस…

नवी माणसं…

आणि अर्थातच नवीन जबाबदारी!

पहिला महिना त्यांनी माझ्याकडून वेगवेगळ्या entries करून घेतल्या.

काम शिकत होते.

ऑफिस समजून घेत होते.

आणि मनाच्या एका कोपऱ्यात मात्र एकच उत्सुकता होती—

“पहिला पगार कधी मिळणार?”

आणि मग तो दिवस आला.

Salary Slip हातात आली…

एक महिना पूर्ण झाला.

आणि पहिल्यांदा माझ्या हातात आली—

Salary Slip!

अहाहा!

त्या क्षणी मी तर अक्षरशः ढगात होते! ☁️❤️

आज salary slip म्हणजे कदाचित एक साधा कागद वाटतो.

पण पहिल्या salary slip ची गोष्टच वेगळी असते.

त्यावर आपलं नाव असतं.

आपल्या कामाची किंमत असते.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—

आपल्या मेहनतीची पहिली अधिकृत पावती असते.

त्या दिवशी पगार मिळाल्याचा आनंद काही औरच होता.

आणि मग झाला तो अविस्मरणीय अपघात!

तेव्हा Sinic Electronics कंपनी धुळ्यात MIDC जवळ highway वर होती.

मी ऑफिसला बाबांची two-wheeler घेऊन जायचे.

त्या दिवशी हातात पहिला पगार होता.

मनात आनंद होता.

डोक्यात विचारांची गर्दी होती—

“आज आईला पैसे द्यायचे…”

“काय घेऊ?”

“घरी गेल्यावर सगळ्यांना सांगायचं…”

आणि कदाचित या सगळ्या विचारांमध्ये माझं लक्ष रस्त्यावर थोडं कमी होतं.

आणि अचानक…

समोरून आलेलं डुक्कर मला दिसलंच नाही! 😄

आणि मग…

धडाम!

मी आणि ते डुक्कर दोघेही धडकलो.

त्या क्षणी खरं सांगायचं तर मला स्वतःपेक्षा आधी गाडीची काळजी वाटली.

कारण मनात पहिला विचार आला—

“हे देवा! गाडीला काही झालं तर?”

घरी गेल्यावर बाबा-आई ओरडणार…

आणि जर गाडी खराब झाली तर?

पहिला पगार सगळा गाडी दुरुस्त करण्यातच जाईल! 😂

नशीब चांगलं होतं.

गाडीला काही झालं नव्हतं.

मीही कसंबसं स्वतःला सावरलं.

गाडी उचलली.

आणि निघाले.

ते डुक्कर मात्र माझ्यापेक्षा शहाणं होतं बहुतेक…

ते तर केव्हाच ओरडत पळून गेलं होतं! 😄

आज विचार केला की त्या प्रसंगावर हसू येतं.

पण त्या दिवशी?

पगार मिळाल्याची खुशी इतकी मोठी होती की मला काही लागलंच नाही असंच वाटत होतं!


घरी गेल्यावर…

गाडीचा किस्सा मनात ठेवून मी घरी पोहोचले.

आणि नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी—

“आई…”

आईसमोर गेले.

हातातले पैसे तिच्या हातावर ठेवले.

पूर्वीचे ते १०० रुपये असोत किंवा पहिल्या official salary चे पैसे…

पहिली कमाई आईच्या हातात देण्याचा आनंद काही वेगळाच होता.

पैशांची किंमत तेव्हा किती होती हे आज आठवतही नाही.

पण त्या क्षणाची किंमत?

ती आजही मनात तशीच आहे.


पहिला पगार म्हणजे फक्त पैसे नसतात…

आज आपण पगार मिळाल्यावर कितीतरी गोष्टींचा विचार करतो.

घरखर्च.

EMI.

Bills.

Savings.

Investments.

जबाबदाऱ्या.

पण पहिला पगार?

तो या सगळ्यांच्या आधीचा असतो.

तो म्हणजे स्वतःवरचा पहिला विश्वास.

“मी काहीतरी करू शकते.”

“मी स्वतः कमवू शकते.”

“माझ्या मेहनतीला किंमत आहे.”

आणि कदाचित म्हणूनच पहिला पगार आयुष्यभर लक्षात राहतो.

रक्कम विसरली जाऊ शकते.

कुठे खर्च केली तेही आठवणार नाही.

पण…

तो पहिला पगार हातात घेतल्याची भावना कधीच विसरता येत नाही.


आजपर्यंत कुणालाच सांगितलं नव्हतं…

आणि हो…

तो डुक्कर वाला किस्सा?

आजपर्यंत हे कुणालाच सांगितलं नव्हतं. 😄

पण Mazi Onjal लिहिताना वाटलं…

काही आठवणी फक्त मनात ठेवण्यासाठी नसतात.

त्या कधीतरी शब्दांत उतरवाव्याही लागतात.

कारण वर्षानुवर्षे पुढे जाताना आपल्याला कधीतरी मागे वळून पाहावंसं वाटतं.

आणि मग जाणवतं—

आपण आज जे काही आहोत, त्यामागे अशाच कितीतरी छोट्या छोट्या आठवणी आहेत.

काही १०० रुपयांच्या…

काही पहिल्या salary slip च्या…

काही आईच्या हातावर पैसे ठेवण्याच्या…

आणि काही…

डुक्कराला धडक देऊनही आनंदी राहण्याच्या! 😄❤️

पहिला पगार किती होता हे कदाचित काळानुसार विसरलं जाईल…

पण त्या पहिल्या कमाईची हुरहूर, आनंद आणि अभिमान मात्र मनात कायम राहतो.

**कारण पहिला पगार हा पगार नसतो…

तो आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असतो.** ❤️


तुमचा पहिला पगार किती होता?

आणि सगळ्यात महत्त्वाचं…

तुमच्या पहिल्या पगारातून तुम्ही पहिल्यांदा काय केलं होतं?

आई-बाबांसाठी काही घेतलं होतं?

स्वतःसाठी काही विकत घेतलं होतं?

की माझ्यासारखाच एखादा मजेशीर किस्सा तुमच्याही पहिल्या पगारासोबत जोडलेला आहे?

तुमची आठवण Mazi Onjal सोबत नक्की शेअर करा. ❤️

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत… ❤️

 

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत… ❤️

काही आठवणी ह्या काळाच्या प्रभावाच्या अगदी पलीकडे असतात. त्यांना तारीख, वेळ, वय असं काहीच नसतं. त्या मनाच्या एका कोपऱ्यात अगदी जपून ठेवलेल्या असतात.

एखादा सुवास, एखादं गाणं, एखादा जुना फोटोसुद्धा क्षणात आपल्याला त्या काळात घेऊन जातो.

तेच घर…

तेच अंगण…

तीच माणसं…

आणि आपण… पुन्हा एकदा लहान झालेले.

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत.

लहानपण तर किती साधं होतं…

ना मोबाईल, ना सोशल मीडिया… प्रत्येक क्षण फोटोमध्ये जतन करण्याची धडपडही नव्हती.

पण तरीही त्या काळात जगलेला प्रत्येक क्षण मनात कुठेतरी कायमचा साठून राहिला.

आज मागे वळून पाहताना जाणवतं, त्या काळात आपल्याकडे फारसं काही नव्हतं; पण तरीही आपण खूप श्रीमंत होतो—आठवणींनी.

आजीचं घर…

आजीच्या घराची आठवण म्हणजे फक्त एक घर नाही.

तो एक अनुभव आहे.

आजीने बनवलेली सांडग्याची भाजी, रात्री केलेली तांदूळ-तूरडाळ खिचडी… आहाहा! अप्रतिम!

आजही आठवलं की तो खमंग सुवास आणि ती चव जिभेवर रेंगाळते.

काहीही खूप मसाले न टाकता ती इतकी सुंदर खिचडी कशी करायची?

कदाचित…

ती तिच्या हातालाच चव होती.

आजीच्या साडीचा तो सुवास आजही आठवतो.

मी तर तिच्या साडीचा ड्रेसच शिवून घेतला होता.

आज त्या साडीचा विचार केला तरी मन पुन्हा त्या दिवसांमध्ये जाऊन पोहोचतं.

आजी आम्हाला गाणी, कविता पण म्हणून दाखवायची.

तिच्या आवाजात कविता ऐकण्याची मजाच काही वेगळी होती.

झोपताना ती मायेने थोपटत म्हणायची—

“रवि गेला रे, सोडुनि आकाशाला
धन जैसें दुर्भाग्याला…
निज नीज माझ्या बाळा…”

त्या शब्दांमध्ये किती माया होती!

आज कितीही वर्षं झाली तरी त्या आवाजाची आठवण मनात तशीच जिवंत आहे.

कधी कधी वाटतं…

आपण मोठे झालो, पण आजीच्या त्या थोपटण्याची गरज मनाला अजूनही आहे.

“किती छान दिवस होते ते…”

आयुष्यात काही माणसं येतात.

काही काळ आपल्यासोबत राहतात.

आपल्यासोबत हसतात, बोलतात, भांडतात, रडतात…

आणि मग एक दिवस त्यांचे रस्ते वेगळे होतात.

काही नाती काळाच्या ओघात दूर जातात.

कधी परिस्थितीमुळे, कधी अंतरामुळे, तर कधी आयुष्याच्या वेगामुळे.

पण काही माणसं दूर गेली तरी त्यांच्या आठवणी मात्र मनातून कधीच दूर जात नाहीत.

आणि मग एखाद्या क्षणी मनात एकच विचार येतो—

“किती छान दिवस होते ते…”

तो जुना फोटो…

मला आठवतं, आम्ही सगळ्या भावंडांनी मिळून एक ग्रुप फोटो काढला होता.

एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून, उंचीप्रमाणे आम्ही सगळे उभे होतो.

तेव्हा तो फक्त एक फोटो होता.

आज तो फोटो हातात घेतला की आपण फक्त चेहरे पाहत नाही…

आपण तो काळ पाहतो.

त्या वेळची माणसं पाहतो.

त्या वेळचं आपलं आयुष्य पाहतो.

आणि कधी कधी त्या फोटोमध्ये आपल्याला आपलंच एक हरवलेलं रूप दिसतं.

तेव्हा जाणवतं—

फोटो जुना झाला असला, तरी त्यातली आठवण अजूनही ताजी आहे.

काळ पुढे जातो…

आपण मोठे होतो.

नोकरी लागते.

लग्न होतं.

मुलं होतात.

जबाबदाऱ्या वाढतात.

आपण सतत पुढे जात राहतो.

पण मनाचा एक छोटासा भाग मात्र त्या जुन्या दिवसांमध्येच राहतो.

कधी एखादं गाणं ऐकलं की…

कधी एखादा सुवास आला की…

कधी एखादा जुना फोटो दिसला की…

तो छोटासा भाग पुन्हा जागा होतो.

आणि आपण काही क्षणांसाठी पुन्हा लहान होतो.

वर्तमान जगायला विसरू नका…

आपण भविष्याची काळजी करताना वर्तमान जगायला विसरतो.

आणि वर्तमान जगताना त्याची आठवण तयार होत आहे, हेही लक्षात येत नाही.

म्हणूनच कधी कधी थांबायला हवं.

आजी-आजोबांच्या आठवणी लिहून ठेवायला हव्यात.

मुलांसोबत मनापासून खेळायला हवं.

मित्रांसोबत मनापासून हसायला हवं.

कारण आजचा हा क्षण…

उद्या कोणाच्यातरी आठवणींचा भाग असणार आहे.

आठवणी म्हणजे आयुष्याची छोटीशी ठेव…

आठवणी म्हणजे आपल्या आयुष्याची छोटी छोटी ठेव असते.

काही आठवणी आनंद देतात.

काही डोळ्यात पाणी आणतात.

काही आपल्याला हसवतात.

तर काही आपल्याला पुन्हा एकदा त्या माणसांजवळ घेऊन जातात, जे आता कदाचित आपल्या जवळ नसतील.

पण म्हणूनच त्या आठवणी मौल्यवान असतात.

कारण माणसं दूर जाऊ शकतात…

जागा बदलू शकतात…

काळ पुढे जाऊ शकतो…

पण मनापासून जगलेले क्षण कधीच संपत नाहीत.

ते आपल्या मनाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात कायम जिवंत राहतात.

म्हणूनच…

काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. ❤️


तुमचीही अशी एखादी आठवण आहे का?

जी कितीही वर्षं झाली तरी आठवली की तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं?

एखादी व्यक्ती, एखादं घर, एखादा सुवास, एखादं गाणं किंवा एखादा जुना फोटो…

तुमची अशी आठवण Mazi Onjal सोबत नक्की शेअर करा. ❤️

शुक्रवार, २६ जून, २०२६

संध्याकाळ थांबली तेव्हा...

 


काही संध्याकाळी फक्त मावळत नाहीत... त्या मनात रेंगाळत राहतात.

खूप दिवसांनी आज संध्याकाळ

माझ्या खिडकीशी निवांत थांबली

आणि नकळत तुझ्या नावाचा सुगंध घेऊन आली '

 

खूप बोललो आम्ही एकमेकांशी

शब्द नाही 

पण भावनांच्या कल्लोळाशी

 

जेवढ्या मावळतीच्या छटा

तिने आभाळभर पसरवल्या,

तेवढ्याच तुझ्या आठवणी

मनात गडद होत गेल्या...

 

उर दाटून आला होता

डोळे थोडे पाणावले

माझ्या काळजीने संध्येने परत जाणे हि नाकारले

 

मी म्हटलं तिला - जा बाई त्या सूर्य मागे ,एकटा सोडू नको त्याला ,

घरी परतत असताना, सोबत तुझीच तर असते त्याला...

 

ती फक्त मंद हसली...

 

आणि निघून जाताना

माझ्या ओंजळीत

तुझ्या आठवणींचा

एक संधिप्रकाश ठेवून गेली.

गौरी


शनिवार, २० जून, २०२६

🌧️ पावसाच्या रंगात चिंब

 



🌧️ पावसाच्या रंगात चिंब

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ...
मातीचा मंद धुंद सुगंध...
आणि मनाला भिजवून टाकणारा पाऊस...

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ, पावसाचा निरोप घेऊन येणारा गार वारा, दुपारीही संध्याकाळ झाल्याचा भास आणि मातीचा मंद धुंद सुगंध... एक-एक थेंब पडायला सुरुवात होते. मग रिमझिम सर येते आणि क्षणार्धात ताशासारखा कोसळणारा पाऊस सुरू होतो.

या सगळ्या वातावरणाबरोबर मनही चिंब भिजून जातं. उन्हाळ्याच्या अस्तित्वाची एकही खूण मागे न ठेवता तो आपल्या आगमनाने सगळा शीण विसरवून टाकतो. फुलांपासून माणसांपर्यंत, पशुपक्ष्यांपासून सृष्टीतील प्रत्येक जीवाला तो आपल्या रंगात रंगवून टाकतो, भिजवून टाकतो.

नव्या उमेदीची, नव्या ऊर्जेची आणि आनंदाची चाहूल घेऊन येणारा हा पाऊस केवळ ऋतू नसतो, तर तो एक अनुभव असतो. प्रत्येक सरीसोबत मनाला नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा, आठवणींना ओलावा देणारा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडणारा हा पाऊस मला खूप आवडतो.

“पाऊस फक्त धरतीला भिजवत नाही, तो मनालाही नव्या उमेदीने चिंब करून जातो.” ☔🌿

#पावसाच्यारंगातचिंब #मराठीब्लॉग #पाऊस #निसर्ग #मनोगत 

सोमवार, १८ मे, २०२६

स्पंदन...Vibration..Aura cleaning

 

स्पंदन...Vibration..Aura cleaning  


काही जागा नकाशावर नसतात
त्या मनाच्या आत दडलेल्या असतात.

 

काही ठिकाणं फक्त पाहिली जात नाहीत
ती आपल्या आत कुठेतरी कायमची जागी होतात.

 

आपण तिथे फक्त जात नाही,
तर नकळत स्वतःलाच भेटून येतो.

 

त्या रस्त्यांना काही जादू असते का…?
की आपल्या आतच काही हरवलेलं असतं,
जे तिथे गेल्यावर शांतपणे सापडतं
हे कधीच कळत नाही.

 

तिथला वारा वेगळा नसतो,
आकाशही नेहमीसारखंच असतं
पण त्या जागेत पाऊल टाकताच
मनावर चढलेली एक अदृश्य धूळ
हलकेच झटकली जाते.

 

मग आपण क्षण क्षण जगू लागतो
जणू वेळ थोडावेळ मंदावली आहे.

आणि त्या सुंदर क्षणांच्या गर्दीतही
मनाच्या एका कोपऱ्यात
एक शांत जाणीव उभी असते

परत जायचं आहे
पुन्हा त्याच घरात,
त्याच कामात,
त्याच आयुष्यात.”

 

पण कदाचित
हाच त्या प्रवासाचा सर्वात गूढ भाग असतो.

कारण परतताना
जागा बदललेली नसते
बदललेलं असतं आपलं स्पंदन.

 

काहीतरी मागे
तिथेच राहिलेलं असतं
आणि काहीतरी नवीन
आपल्या आत जन्माला आलेलं असतं.

 

म्हणूनच काही प्रवास कधीच संपत नाहीत.

आपण घरी परततो
पण मन अजूनही
त्या जागेच्या शांत प्रतिध्वनीत
हळूच रुंजी घालत राहतं

 

प्रवास संपतो
पण त्या जागेची स्पंदनं
मनात बराच काळ फिरत राहतात.”

 

Gauri Ekbote

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

ओढ अनामिक

 




शब्द हरवले, डोळे बोलत राहिले गं

सांगितलेलं तुझ्यापर्यंत पोहोचविलं. ।।

आर्तता ही मनाची,मनालाच कळाली गं,

ओढ अनामिक एकमेका लागली गं ।।

 

गौरी


शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

✨ जिवाशिवांची जडलेली समाधी ✨



जिवाशिवाची जडली समाधी,
अंतरीची सारी व्याकूळता निवळली.
पडलेले सारे कल्लोळही थांबले,
ना काळ राहिला, ना दिशा ह्या दाही.

श्वासांची ही हरवली ती लय,
देहाच्या आठवणीही गेल्या विझून.
स्वतःचेही न उरले भान—
शून्यातून उमटला एक तो  सूर — श्रीकृष्ण,  श्रीकृष्ण…

विटला प्रपंच, तुटली उपाधी,
मनाची सारी चंचलता थांबली.
निरभ्र शांततेत उमलला एक लय—
मन जाहले आता हरिमय, हरिमय.

गौरी