mazionjal

सोमवार, १८ मे, २०२६

स्पंदन...Vibration..Aura cleaning

 

स्पंदन...Vibration..Aura cleaning  


काही जागा नकाशावर नसतात
त्या मनाच्या आत दडलेल्या असतात.

 

काही ठिकाणं फक्त पाहिली जात नाहीत
ती आपल्या आत कुठेतरी कायमची जागी होतात.

 

आपण तिथे फक्त जात नाही,
तर नकळत स्वतःलाच भेटून येतो.

 

त्या रस्त्यांना काही जादू असते का…?
की आपल्या आतच काही हरवलेलं असतं,
जे तिथे गेल्यावर शांतपणे सापडतं
हे कधीच कळत नाही.

 

तिथला वारा वेगळा नसतो,
आकाशही नेहमीसारखंच असतं
पण त्या जागेत पाऊल टाकताच
मनावर चढलेली एक अदृश्य धूळ
हलकेच झटकली जाते.

 

मग आपण क्षण क्षण जगू लागतो
जणू वेळ थोडावेळ मंदावली आहे.

आणि त्या सुंदर क्षणांच्या गर्दीतही
मनाच्या एका कोपऱ्यात
एक शांत जाणीव उभी असते

परत जायचं आहे
पुन्हा त्याच घरात,
त्याच कामात,
त्याच आयुष्यात.”

 

पण कदाचित
हाच त्या प्रवासाचा सर्वात गूढ भाग असतो.

कारण परतताना
जागा बदललेली नसते
बदललेलं असतं आपलं स्पंदन.

 

काहीतरी मागे
तिथेच राहिलेलं असतं
आणि काहीतरी नवीन
आपल्या आत जन्माला आलेलं असतं.

 

म्हणूनच काही प्रवास कधीच संपत नाहीत.

आपण घरी परततो
पण मन अजूनही
त्या जागेच्या शांत प्रतिध्वनीत
हळूच रुंजी घालत राहतं

 

प्रवास संपतो
पण त्या जागेची स्पंदनं
मनात बराच काळ फिरत राहतात.”

 

Gauri Ekbote