mazionjal

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

आकाश

 


दूर डोंगर क्षितिजाशी बसून निळाईला न्याहाळत हरवून जायला होत

हे आकाश मोठं चमत्कारिक हं , आणि तेवढंच fashionable.

म्हणजे बघ ना - सकाळ होताच गुलाबी रंगाची उधळण त्यात हि खूप वेग वेगळया सुंदर  छटा

उगवतीला बघितलं तर लाल रंग आणि त्या नंतर इतरत्र फिकट गुलाबी त्या हि पुढे निळा आणि काळा असा मिश्रित रंग कि ज्याला  थोडी गुलाबी किनार आणि त्यात पहाटेचा शांत गार वारा अहाहा .....

जसा जसा सूर्य वर येईल तस तस ती लाली आजून वाढत जाणार आणि दुपार पर्यंत पिवळ्या रंगाचे कपडे घालून केव्हा तयार होऊन येईल कोणाला कळणार देखील नाही

किती तरी रंग , रंगाच्या छटा हे आकाश पांघरून असत

कधी निळा , कधी लाल,तर कधी गुलाबी   

कधी काळा , कधी पिवळा तर कधी केशरी

रात्रीच्या आकाशाची तर सजण्याची मजा काही न्यारी

नुसतं काळया रंगाचे कपडे घालून नाही तयार होणार  तर त्या गडद काळ्या कपड्यावर चांदण्याच जरी वर्क

आणि चंद्राचं कोंदण करून घेणार, रातराणीच्या अत्तराचा छोटासा फाय जवळ ठेवणार

आणि शांत स्तब्ध तलावात एक सारखं स्वःताच रूप न्याहळत बसणार ,

संध्याकाळी बगळ्यांच्या रांगेत गप्पा गोष्टी करणार    

तर घारी  बरोबर उंच उंच जाण्याची शर्यत जमवणार

 एखादा भरकटलेला ढग आलाच मध्ये तर हवे च्या बरोबर त्याला त्याच्या घरी सोडणार

नदी बरोबर उद्या मारत अवखळत समुद्राला जाऊन भेटणार

डोंगराच्या पलीकडे जाणाऱ्या सूर्याला चिमण्या पाखरांन बरोबर बाय बाय करणार आणि त्याला स्वतःत सामावून घेणार आणि परत म्हणणार "उद्या भेटू रे ... "

गौरी एकबोटे

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

कृष्णा लीला : कुवलयापीड चा वध

 

समस्त शस्त्र विद्येत पारंगत , एक लाख हत्तीचं बळ असलेला , प्रचंड , विशालकाय , बलवान असा  बळी राजाचा मुलगा मंदगती , हा अतिशय उन्मत्त ,राजकुमार होता पण तो रंगनाथ चा निस्सीम भक्त होता . 

रंगनाथ च्या यात्रे साठी लोक खूप लांबून पायी चालत येत, हातात झेंडे , पताका मृदंग वाजवत ते यात्री त्या यात्रेस जात , त्यात अनेक प्रकारचे लोक असत , बायका, माणसं , मुलं , साधू , संन्यासी , त्या परम ईश्वराचे नाव घेत भजन कीर्तन करत ते आपला मार्ग क्रमण करत

 एकदा मंदगती  रंगनाथ च्या यात्रा  साठी पायी जायला निघाला , तो ह्या गर्दीत घुसून झपाझप  आपल्या विशाल बहू मागे पुढे हलवत , हत्तीची चाल चालत ढांगा टाकत चालू लागला  , त्याच्या त्या विशाल बाहुंचा धक्का लागून अनेक माणसं , बायका मुलं खाली पडत होते काही त्याच्या पायाखाली चिरडले जात होते

आणि अश्यातच त्याचा धक्का मुनिवर्य त्रित ह्यांना लागला आणि ते खाली पडले. आजूबाजूची जखमी मानस बघून , मंदगतीचा उन्मत्तपणा बघून मुनी त्रित ह्यांना प्रचंड राग आला त्यांनी त्याच क्षणी मंदगतीला शाप दिला " तू हत्ती सारखा उन्मत्त होऊन वाटेतील सगळ्यांना चिरडत पुढे जात आहेस , तू आत्ता  ह्या क्षणा पासून एका हत्तीचं जीवन हत्ती होऊन जगशील " आणि मंदगतीला ह्या शापाचा परिणाम लगेचच दिसू लागला , मुनींच्या त्या तेजाला त्याने ओळखलं आणि हात जोडून त्यांची माफी मागितली आणि तुम्ही कृपासिंधु आहांत , श्रेष्ठ योगीन्द्र आहेत , मला माझी चूक कळली आहे ,  मला माफ करावं , तुमच्या सारख्या महात्म्यांचे मी ह्या पुढे अवहेलना न करता आदराचं करेल , अशी चूक परत नाही करणार , तुमच्या सारखे योगीच एखाद्याला शाप आणि उपशाप देण्यासाठी समर्थ असतात , मला उपशाप द्यावा हि विनंती तो करू लागला. त्याच्या विनवणिला , आर्जवाला मुनींनी होकार दिला आणि त्याला उपशाप दिला तो असा कि - माझी वाणी कधी हि खोटी नाही होणार , मी तुझ्या श्रीरंगाच्या भक्ती ला जाणतो , आणि म्हणूनच मी तुला असा दिव्य वर देणार आहे कि जो कोणत्याची देवाला ह्या आधी मिळालेला नाही , हे मंदगती तू शोक करू नको श्रीहरीची नागरी मथुरा मध्ये स्वतः श्रीहरीच्या हाताने तुझा उद्धार होईल तुला मुक्ती मिळेल "

 

त्या नंतर बरेच वर्ष मंदगती हत्ती हा मगध राज्य जवळील अरण्यात भटकत राहिला , मगध देशाचा राजा एकदा आपला संपूर्ण ताफा घेऊन शिकारी साठी जंगलात गेला असता त्याला मंदगती हा बलाढ्य हत्ती दिसला आणि हा आपल्या हत्तीच्या कळपात  असावा  म्हणून त्याने मंदगतीला हजारो हत्तीच्या  मदतीने पकडले आणि मगध देशात घेऊन आला , पुढे हा बलाढ्य हत्तीला मगध राजा जरासंध ने कंस ह्याला आपल्या मुलींच्या लग्नात हुंड्यात प्रदान केला .

 

कंस ला हि हा मदमस्त , बलिष्ठ , बलाढ्य हत्ती खूप आवडला , कंस ने ह्या हत्तीचे नाव कुवलयापीड़ असं ठेवले आणि त्याला विशेष प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली , बलराम आणि कृष्ण ह्यांना मारण्याचे विशेष प्रशिक्षण त्याला  देण्यात आले   .

मथुरे मध्ये जेव्हा अक्रूर बलराम आणि कृष्णाला घेऊन आले तेव्हा नगर , रंगशाळा बघायला हि दोघे निघाले असता रंगशाळेत आले , तेव्हा दरवाज्यातच कुवलयापीड त्याच्या माहूत बरोबर उभा होता . कृष्णा ने माहुताला त्यांचा रास्ता सोडणायचा आग्रह केला पण माहुताने कुवलयापीडला अंकुश चा जोरदार मारा केला आणि श्री कृष्णच्या पुढे जायला भाग पडले , त्या मारा ला चिडून कुवलयापीड ने कृष्णाला आपल्या सोंडेत पकडला आणि आपटू लागला , श्री कृष्णाने स्वःताला त्याच्या तावडीतून सोडून त्याच्या पायाखाली लपले , ते दिसत नाही म्हणून तो बलिष्ठ हत्ती आजून चिडला , त्याने वासाने कृष्णाला सापडवल आणि  सोंडेने बाहेर काढले , पण परत श्री कृष्ण त्याच्या तावडीतून सुटले त्यांनी त्याची शेपूट पकडून जस ते वृंदावनात गायीनशी खेळत तसे खेळू लागले . कुवलयापीड ह्या मुळे आजून चिडला आणि श्री कृष्णावर जोरात धावून गेला , श्री कृष्ण ने त्याची सोंड पकडून त्याला खाली पडले आणि त्याचे दोन्ही दात उपटले आणि कुवलयापीड चा वध केला त्याचा उद्धार केला.


मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

चिऊचं पिल्लू


 

इवलंसं चिऊ च  घरटं 

त्यात इवलेसे तिचे  पिल्लू 


इवल्या इवल्या पिल्लू चे इवले इवले आभाळ 

इवल्याश्या पंखांना उडण्याची  घाईच  फार 


इवलीशी ती धडपड पंखांची  फडफड 

इवल्या इवल्या जीवाची उडण्याची तडफड 


आभाळात उडायचे उंच उंच लांब 

कधी ह्या झाडावर तर कधी त्या डोंगराच्या  पार 

घटकेत खाली जमिनीवर तर घटकेत वर आकाशात 

पिल्लाची तर आहेत स्वप्न अशी महान 


इवलुश्या पिल्लू ची  इवलुशीच झेप 

ठाऊक आहे चिऊला , लवकरच भरारी घेईल हे थेट  


गौरी 

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

अचलकीला -अचला

 

वसुंधरा ल्यायली आकाशी शाल

हिरवा भरजरी शालू अन सप्तरंगी इंद्रधनू ची माळ

 

क्षितीजाच्या भाळावर सूर्याचं गोंदण

रात्रीच्या आकाशाला चंद्राचं कोंदण

 

वाऱ्याच्या बांगड्यांची किणकिण ती फार

नदीच्या बटांमध्ये बदकांची रांग

 

दाट धुक्याची पावडर ,सुगंधी दवाचा शिडकाव

रात्रीच काजळ कमल नयनात

 

रंगीत रंगीत फुलपाखरा सम  कर्णफुले ती छान

भाळावर रुळे इंद्रधनू ची कमान

 

प्राकृतिक तिचे सौंदर्य , अलौकिक ती धरा

अशी आहे माझी अचलकीला -अचला,रत्नगर्भा,वसुधा-वसुंधरा.

 

गौरी

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

बंध

 


#बंध 

प्रेम माया भक्ती जुळून येतात अनुबंध 

देणं घेणं उरलं सुरलं जुळवून आणतात ऋणानुबंध 

नाजूक कोमल हळुवार हे बंध रेशमाचे 

हृदयातून हृदयाशी  बंध हृदयाचे

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

नंद यशोदा

 

गेली १०१ वर्ष आज पुर्ण झाली ऋषी द्रोण आणि त्यांची पत्नी धारा ह्यांच्या  तपश्च्यर्यला , भगवंताने फक्त एकदा दर्शन द्यावं एवढीच इच्छा

त्या दर्शनाने सगळी पाप , सगळे जन्म उजळून जातील , त्याची भक्ती अशीच सतत मनात राहू दे आणि ती अशीच वृद्धिगत होऊ दे हेच मागणे

ह्या साठीच हि दोघे गेली १०० वर्ष त्या परमात्म्याची मनोभावे पूजा अर्चा तपश्चर्या करत होते

आणि आज तो सोनिया चा दिवस उगवला , त्या दोघांच्या त्या कठोर व्रताला त्या तपश्चयेला आज फळ आलं आज जीवन सार्थकी लागलं , साक्षात ब्रह्म देव ह्या दोघांपुढे प्रगट झाले , दोघांनीही त्यांचे मनोभावे पूजा केली, नाना विविध फुलांचे हार त्यांना वाहिले , त्यांची  यथासांग पूजा अर्चा करून नैवेद्य दिला.  त्यांच्या भक्तीला आज फळ आलं होत देवानं विचारलं " काय वर देऊ मी तुम्हाला " .  दोघे हि बोलले - "हे परमात्मा परमेश्वर आपले दर्शन झाले हेच आमचे अहो भाग्य, आमचे एकच मागणे आहे जेव्हा भगवान विष्णू स्वःतः ह्या पृथ्वीवर जन्म घेतील , तेव्हा हे भगवन , त्या  जगदीश्वरची सेवा करण्याचे , त्याच्या त्या लीला बघण्याचे , आम्हाला भाग्य लाभो , आमच्या हृदयात त्या भगवंताची प्रेममयी भक्ती त्या वेळेस राहो हेच आमचे मागणे" ब्रम्हदेव " तथास्तु " म्हणून अदृश्य झाले .

आणि ऋषी द्रोण , माता धारा ह्यांचा हा जन्म सार्थकी लागला .  पुढच्या जन्मात ऋषी द्रोण वृंदावनवासी नंद म्हणून जन्माला आले आणि त्यांची पत्नी धारा माता यशोदा .  



 

गुरुवार, २६ मे, २०२२

इंटरनेट प्रेम

 तू मी आणि हे whatsapp 

तुझ्या माझ्या प्रेमाचं इथेच सुरु झालं  Startup 

hi , Hello गुड मॉर्निंग ने झाली बोलायला सुरुवात 

DP ला लाइकून इमोजींची बरसात 

forwarded कविता आणि सुविचारांना दिला send-off 

माझ्याच कल्पना विलास ने  घेतला  takeoff  

gif आणि sticker ची होती साथ आणि संगत 

attachment ला दिली गूगलबाबांच्या Image  ने पंगत 

video कॉल , voice  कॉल ने डेटा केला ५०% Used 

इंस्टाग्राम , Facebook ने राहिलेला केला loose 

टॉप up चा  recharge किती वेळ हो  पुरणार 

पॉकेटमनी चा हि विचार करावा तो  लागणार

online असतांनाच प्रेम , डेटा मुळे offline झालं 

 प्रेमाला बहर येण्या आधीच network च गेलं 


गौरी 

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

सांजवेळ

 दूर क्षितिजा  जवळ, डोंगर रांगांच्या कडेला, जेव्हा सूर्य दिवसभरचा दमून भागून क्षणभर विसावा घेतो 

मावळतीचे स्वतःचेच रंग बघत काहीतरी आठवत  डोंगर आड निघून जातो

ती वेळ म्हणजे सांजवेळ

 

 एक एक आठवण लाट बनून मनावर आदळते आणि अश्या  आठवणींना जेव्हा उधाण येत

ती वेळ म्हणजे कातरवेळ

 

लांब च्या प्रवासाला गेलेलं आपलं पिल्लू येणार आहे ,ते अजून कस नाही आलं , अशी हूर हूर लावून वाटे कडे डोळे लावणाऱ्या आईची  वेळ

तिन्हीसांजेची वेळ

 

केव्हा एकदाच  घरी पोहोचतोय आणि आई च्या हातचा चहा पित तीला दिवस भरच घडलेल कधी एकदाच सांगतोय

अशी शेअरिंग ची वेळ म्हणजे इव्हनिंग ची वेळ

 

शाळा सुटल्यावर बरोबर जाऊ , तू गेटलाच थांब ,

ऑफिस सुटल्यावर कट्ट्यावर भेटू,

अश्या प्लॅनींगची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ

 

अशी एक वेळ जेव्हा खूप उजेड हि नसतो आणि रात्री चा काळा अंधार हि नसतो

अश्या वेळेला जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असतात,

 ती जोडणारी वेळ म्हणजे संधिप्रकाशाची वेळ

 

मावळतीचा सूर्य बघत , एकमेकांच्या हातात हात घालून समुद्रकाठच्या वाळूत बसणं

म्हणजे  संध्याकाळची “तिला” दिलेली वेळ

 

हूर हूर त्या दिवसाचा शेवट आणि रम्य रात्रीची चाहूल लावणारी वेळ

सांजवेळ

 

गौरी एकबोटे