mazionjal

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

भक्ती

देव शेणमातीचा
देव सोन्याचांदीचा
देव पाषाणाचा
देव तांब्यापितळ्याचा
जसा ज्याचा भाव, तसा देवाचा असे ठाव ,
ज्याची जशी भक्ति , तशी मिळे देवाची प्रचिती ।।

शोधिसी देवा आसमंतात
तोच वसे फक्त तुझ्यात
देव निर्गुण निराकार
आदी अंत पुर्ण साकार  ||
देव निर्विकार व्यापक
दृश्य , अदृश्य निर्विकल्प
         देव सर्व व्यापक
       देव अनेकांत एक
देव सगळ्याहुन  थोर
स्थूल सूक्ष्म परमात्मा परमेश्वर ।।

संकटे हि अमाप
तारणहार तो एक
असमाधान हा रोग
नाम तुझे हे त्यावरील औषध ।।

तळमळ वाढे जीवाची
आस फक्त तुझ्या दर्शनाची
ओढ लागु दे तुझी
गोडी वाढू दे नामाची ।।

शनिवार, १० डिसेंबर, २०१६

समुद्र ओढ

अशी कोणती ओढ आहे
ह्या समुद्राची
कि साऱ्या नद्या त्याच्याकडे
धावत येतात आणि समुद्रच होऊन जातात

                                                असं काय आहे ह्या जलधि जवळ
                                                कि हर एक लाट , किनाऱ्या जवळ जाऊन परत मागे फिरते

असं काय गुपित आहे
ह्या रत्नाकरा कडे
कि धरा सुद्धा ह्यात
एकरूप होऊन जाते

                                     कदाचित अथांग , विशाल शांत
                                      तेवढाच रौद्र , उग्र
                                      गूढ अफाट कणखर
                                     जलाय समंजस समजूतदार
                                     अमर्याद असून मर्यादा सांभाळणारा आहे म्हणून 

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

सूर्याचा देश




एकदा बघायचाय सूर्याचा देश
लख्ख उजेडात न्हायलेला प्रदेश

जिथे सूर्यकिरणं दव बिंदुला देतात एक नवी झळाळी
उबदार हवेची असतें घोंगडी
स्वच्छ सुंदर आकाश , स्वच्छ सुंदर प्रकाश
स्वच्छ हवेच्या शुद्ध उजेडात

जिथे नसतोच मुळी काळोख
काळोखाच्या पोटातील आक्रोश
नसतात आर्त किंकाळ्या अन मनामनाच्या लढाया

सूर्याच्या देशात असतो म्हणे एक सागर
आनंदाच्या लाटा सतत असतात त्यावर
म्हणूनच एकदा बघायचाय सूर्याचा देश
आनंदानं भरलेला लाटांचा प्रदेश



मंगळवार, २१ जून, २०१६

अरे ..... जाऊन सांगा त्या दुःखाला

अरे ..... जाऊन सांगा त्या दुःखाला 
मी नाही घाबरत आता त्याला 
पाठीराखा आहे माझा 
तो पंढरीचा त्राता ||


कशाला असावे मी गाळू
व्यर्थ चिंता ती मी करू
आता तोच एक कनवाळू      
         विठुराया ||

नको गंडे आणि दोरे
नको नवस बिवस
त्याच्या नामाचा गजर
हा  एकच उपाय ||

हाती घेतले ते टाळ
मुखी विठूरायाचे ते नाम
पायी चालावी वारी
अन गाठावी पंढरी ||

त्याच्या दर्शनानें बघ
डोळे आपोआप भरती
सर्व दुःख हरून जाती
अशी माझी माय माउली ||



Gauri Ekbote