mazionjal

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

अचलकीला -अचला

 

वसुंधरा ल्यायली आकाशी शाल

हिरवा भरजरी शालू अन सप्तरंगी इंद्रधनू ची माळ

 

क्षितीजाच्या भाळावर सूर्याचं गोंदण

रात्रीच्या आकाशाला चंद्राचं कोंदण

 

वाऱ्याच्या बांगड्यांची किणकिण ती फार

नदीच्या बटांमध्ये बदकांची रांग

 

दाट धुक्याची पावडर ,सुगंधी दवाचा शिडकाव

रात्रीच काजळ कमल नयनात

 

रंगीत रंगीत फुलपाखरा सम  कर्णफुले ती छान

भाळावर रुळे इंद्रधनू ची कमान

 

प्राकृतिक तिचे सौंदर्य , अलौकिक ती धरा

अशी आहे माझी अचलकीला -अचला,रत्नगर्भा,वसुधा-वसुंधरा.

 

गौरी

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

बंध

 


#बंध 

प्रेम माया भक्ती जुळून येतात अनुबंध 

देणं घेणं उरलं सुरलं जुळवून आणतात ऋणानुबंध 

नाजूक कोमल हळुवार हे बंध रेशमाचे 

हृदयातून हृदयाशी  बंध हृदयाचे

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

१०१ वर्षांच्या तपश्चर्येला आलेले फळ | ऋषी द्रोण आणि माता धारा

 

🌸 १०१ वर्षांच्या तपश्चर्येला आलेले फळ… 🌸

ऋषी द्रोण आणि माता धारा — भक्ती, तपश्चर्या आणि भगवंताच्या प्रेमाची कथा

गेली १०१ वर्षे ऋषी द्रोण आणि त्यांची पत्नी माता धारा एका अद्भुत संकल्पाने तपश्चर्या करत होते.

त्यांची इच्छा फार मोठी नव्हती…

त्यांना ना संपत्ती हवी होती, ना ऐश्वर्य, ना कोणतेही भौतिक सुख.

त्यांच्या मनात फक्त एकच इच्छा होती—

“परमात्म्याने आम्हाला फक्त एकदा दर्शन द्यावे…”

कारण त्या एका दर्शनाने असंख्य जन्मांचे पाप धुऊन जाईल, जीवन पावन होईल आणि हृदयातली भगवंतावरील भक्ती अशीच अखंड राहील, वृद्धिंगत होत राहील—
हीच त्यांची एकमेव प्रार्थना होती.

याच इच्छेसाठी ऋषी द्रोण आणि माता धारा गेली शंभर वर्षे त्या परमात्म्याची मनोभावे पूजा-अर्चा, उपासना आणि कठोर तपश्चर्या करत होते.

आणि अखेर…

🌺 तो सोनियाचा दिवस उगवला! 🌺

त्यांच्या कठोर व्रताला, त्यांच्या निष्ठेला, त्यांच्या तपश्चर्येला आज फळ आले होते.

साक्षात ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रगट झाले.

दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही.

त्यांनी ब्रह्मदेवांची मनोभावे पूजा केली. नाना प्रकारच्या सुगंधी फुलांचे हार अर्पण केले. यथासांग पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला.

त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी विचारले—

“वत्सांनो, सांगा… तुम्हाला कोणता वर हवा आहे?”

तेव्हा ऋषी द्रोण आणि माता धारा हात जोडून म्हणाले—

“हे परमात्मा, परमेश्वरा… आज आपले दर्शन झाले, हेच आमचे अहोभाग्य आहे. आम्हाला यापेक्षा दुसरे काहीही नको.”

क्षणभर थांबून त्यांनी आपली मनातील इच्छा व्यक्त केली—

“जेव्हा भगवान श्रीविष्णू स्वतः पृथ्वीवर अवतार घेतील, तेव्हा हे भगवन्, त्या जगदीश्वराची सेवा करण्याचे, त्याच्या दिव्य लीला आपल्या डोळ्यांनी पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभावे.”

“त्या जन्मातही आमच्या हृदयात भगवंताविषयी अशीच प्रेममयी भक्ती राहावी. त्याच्या चरणांची सेवा करता यावी, त्याला आपल्या प्रेमाने बांधून ठेवता यावे… एवढीच आमची इच्छा.”

त्यांची ही निःस्वार्थ इच्छा ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले.

त्यांनी आशीर्वाद दिला—

“तथास्तु!”

आणि ब्रह्मदेव अंतर्धान पावले.

ऋषी द्रोण आणि माता धारा यांचा तो जन्म आज सार्थकी लागला होता.

त्यांची तपश्चर्या सफल झाली होती.

त्यांची भक्ती सफल झाली होती.

आणि त्यांच्या मनातील इच्छा परमेश्वराने स्वीकारली होती.


🌿 पुढचा जन्म…

काळ पुढे सरकला.

भगवान श्रीविष्णूंनी पृथ्वीवर श्रीकृष्णाच्या रूपाने अवतार घेतला.

आणि ऋषी द्रोण यांचा पुढचा जन्म झाला—

वृंदावनवासी नंद महाराज म्हणून.

आणि माता धारा जन्माला आल्या—

माता यशोदा म्हणून. ❤️

ज्या भक्तीची इच्छा त्यांनी १०१ वर्षांच्या तपश्चर्येत केली होती, ती भक्ती त्यांना मिळाली.

ज्या भगवंताच्या दर्शनाची आस त्यांनी मनात धरली होती, तोच परमात्मा त्यांच्या अंगणात लहानसा कान्हा बनून खेळू लागला.

ज्या जगदीश्वराच्या लीला पाहण्याची त्यांनी इच्छा केली होती, त्या लीला पाहण्याचे भाग्य माता यशोदेला लाभले.

आणि सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे—

ज्याच्या दर्शनासाठी त्यांनी तपश्चर्या केली होती, त्याच भगवंताला पुढच्या जन्मात त्यांनी आपल्या कुशीत घेतले.

ज्याला संपूर्ण ब्रह्मांड नमस्कार करते,
तोच श्रीकृष्ण “आई… आई…” म्हणत यशोदामातेच्या मागे धावत होता.

हीच तर भक्तीची पराकाष्ठा…

🙏 देवाला मागायचं तरी काय?

धन नाही, दौलत नाही, स्वर्ग नाही…

फक्त—

“देवा, तुझी भक्ती माझ्या हृदयात सदैव राहू दे.”

कारण जिथे अशी निःस्वार्थ भक्ती असते,
तिथे परमेश्वराला स्वतः भक्ताकडे यावेच लागते.

द्रोण आणि धारा यांनी देवाकडे काही मागितले नाही…
त्यांनी फक्त देवाला मागितले.

आणि म्हणूनच त्यांच्या तपश्चर्येचे फळ इतके अद्भुत होते—

भगवंत त्यांच्या आयुष्यात आले नाहीत,
तर त्यांच्या पुढच्या जन्मात
भगवंतच त्यांचा पुत्र बनून त्यांच्या अंगणात आले…!
❤️

🌸 जय श्रीकृष्ण! 🌸

— माझी ओंजळ



 

गुरुवार, २६ मे, २०२२

इंटरनेट प्रेम

 तू मी आणि हे whatsapp 

तुझ्या माझ्या प्रेमाचं इथेच सुरु झालं  Startup 

hi , Hello गुड मॉर्निंग ने झाली बोलायला सुरुवात 

DP ला लाइकून इमोजींची बरसात 

forwarded कविता आणि सुविचारांना दिला send-off 

माझ्याच कल्पना विलास ने  घेतला  takeoff  

gif आणि sticker ची होती साथ आणि संगत 

attachment ला दिली गूगलबाबांच्या Image  ने पंगत 

video कॉल , voice  कॉल ने डेटा केला ५०% Used 

इंस्टाग्राम , Facebook ने राहिलेला केला loose 

टॉप up चा  recharge किती वेळ हो  पुरणार 

पॉकेटमनी चा हि विचार करावा तो  लागणार

online असतांनाच प्रेम , डेटा मुळे offline झालं 

 प्रेमाला बहर येण्या आधीच network च गेलं 


गौरी 

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

सांजवेळ

 दूर क्षितिजा  जवळ, डोंगर रांगांच्या कडेला, जेव्हा सूर्य दिवसभरचा दमून भागून क्षणभर विसावा घेतो 

मावळतीचे स्वतःचेच रंग बघत काहीतरी आठवत  डोंगर आड निघून जातो

ती वेळ म्हणजे सांजवेळ

 

 एक एक आठवण लाट बनून मनावर आदळते आणि अश्या  आठवणींना जेव्हा उधाण येत

ती वेळ म्हणजे कातरवेळ

 

लांब च्या प्रवासाला गेलेलं आपलं पिल्लू येणार आहे ,ते अजून कस नाही आलं , अशी हूर हूर लावून वाटे कडे डोळे लावणाऱ्या आईची  वेळ

तिन्हीसांजेची वेळ

 

केव्हा एकदाच  घरी पोहोचतोय आणि आई च्या हातचा चहा पित तीला दिवस भरच घडलेल कधी एकदाच सांगतोय

अशी शेअरिंग ची वेळ म्हणजे इव्हनिंग ची वेळ

 

शाळा सुटल्यावर बरोबर जाऊ , तू गेटलाच थांब ,

ऑफिस सुटल्यावर कट्ट्यावर भेटू,

अश्या प्लॅनींगची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ

 

अशी एक वेळ जेव्हा खूप उजेड हि नसतो आणि रात्री चा काळा अंधार हि नसतो

अश्या वेळेला जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असतात,

 ती जोडणारी वेळ म्हणजे संधिप्रकाशाची वेळ

 

मावळतीचा सूर्य बघत , एकमेकांच्या हातात हात घालून समुद्रकाठच्या वाळूत बसणं

म्हणजे  संध्याकाळची “तिला” दिलेली वेळ

 

हूर हूर त्या दिवसाचा शेवट आणि रम्य रात्रीची चाहूल लावणारी वेळ

सांजवेळ

 

गौरी एकबोटे

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

MARS Mission


 

नासा च्या हेड ऑफिस मध्ये फुल गोंधळ होता सगळे विचार करत होते

वेग वेगळे ऑपशन suggestion  येत होते

मी आपलं उशीर झाला म्हणून धावत पळत ऑफिस नुकतच गाठलं होत

बॅग जागेवर ठेवली तेवढ्यात ऑफिसबॉय ने सांगितलं लगेच बोलावलं आहे साहेबानी

एवढं काय झालं असेल....  का सगळे जमा केले.... हा विचार करत मी साहेबांच्या केबिन कडे निघाले  तस हि त्यांना माणसं गोळा करायची सवयच

आत्ता आज काय नवीन खुळ डोक्यात ह्या माणसाच्या म्हणून मी गेले आणि केबिन च दार उघडलं ..सगळे सायंटिस्ट तिथे गहन  विचारात होते

काय चाललंय काहीच कळेना ... मग आमचे बॉस ,,, खर सांगायचं तर बॉस कमी friend  जास्तच एक एक गोष्ट explain करायला लागले

तर झालं असं कि -

आम्ही गेले १० महिने मार्स म्हणजे मंगल ग्रह ह्या प्रोजेक्ट वर काम करत आहोत ,,, रोज वेग वेगळे फोटो येतात त्यावरून तिथल्या वातावरणाचा आमच्या टीम ला अभ्यास करायचं प्रोजेक्ट .  तर कल रात्री आमच्या बॉस च्या असं लक्षात आलं कि मार्स वर गेले दोन तीन दिवस खूप मोठ्ठा ढग तयार झालाय , आणि  आज तो  इतका मोठ्ठा झालाय कि त्याने सगळा  ग्रहच व्यापून टाकलाय , त्या ढगाचा नीट अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं कि तो जर आज पृथ्वी वर असता तर आपल्याला खूप त्या पासून फायदा झाला असता (तो काय हे काही माझ्या लक्षात येत नाही ) , तर खूप मोठ्ठा फायदा झाला असता, सगळी टीम असं ठरवते कि तो ढग पृथीवर आणायचा त्याला तिथून ढकलायचा आणि पृथीवर ओढून आणायचा . मग काय आम्ही सगळे कामाला लागतो

काही लोक पृथीवरच असतात तिथून त्या ढगांचं निरीक्षण करायला, काही अंतराळातुन निरीक्षण करतात आणि मी व माझी ५-६ लोकांची टीम मंगळावर आम्ही तो ढग तिथून खूप काही उपकरण वापरून ढकलतो अंतराळात आणि आमच्या यानात बसतो त्या ढगाचा पाठलाग करायला

पण जस आमचं यान मंगळ ग्रहावरून अंतराळात येते....  आम्ही जस काही खूप खोल समुद्रात उडी मारल्यावर नाही का आपण पहिले एकदम खाली जातो आणि मग परत डुबकी मारून परत वर येतो तसे वर आलो , खाली असताना माझ्या मनात एकच विचार ,,, साल त्या ढंगाचं लोकेशन  तर आपण नाही सोडणार ना ......... पण अंतराळातील आमची टीम त्याच्या मागेच असते ,,, पृथ्वी वरून सुद्धा काही लोक त्याला वेग वेगळ्या उपकरणांनी ओढत असतात आणि शेवटी एकदाचा तो ढग आम्ही पृथ्वी वर आणतो , मध्ये खूप अडचणी येतात पण त्या नंतर कधी तरी सांगेल

तर तो ढग पृथ्वी वर येतो इतर सायंटिस्ट जे chemical चेक करतात ते त्या ढगांचं परीक्षण करतात .. सॅम्पल घेऊन......  आणि मी मात्र माझ्या घरी येते

खुप मोठ्ठं मिशन आज पूर्ण झालेलं असत आणि घरी येऊन मी मस्त सोफ्यावर झोपते आणि अचानक झोपेत मी खाली पडते

आणि जाग आली ते आज पहाटेचे ५:२५am झाले होते ... मग लक्षात आलं अरे स्वप्न होत तर .....

  Gauri Ekbote

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

मी

 



जीर्ण रीतींचे घाव हे  ,सोसणे मी सोडले 

उमलुनी राखेतून आता स्वप्न नवे मी पहिले 

एकवटून जीव आता बळ पंखात आणले 

क्षितीजाच्या भाळावरती यश कीर्ती चे मळवट भरले 


दूर केल्या दुःख यातना , झिडकारले मी सोसणे , 

मुक्त झाले मी तर आता स्वाभिमानास  उंचावले

गवसले आज मीच मला ,शिळेची मी  अहिल्या झाले 

नशिबाच्या गगनात आता इंद्रधनुचे रंग उमटवले

गौरी एकबोटे



गौरी एकबोटे