mazionjal

शुक्रवार, २६ जून, २०२६

संध्याकाळ थांबली तेव्हा...

 


काही संध्याकाळी फक्त मावळत नाहीत... त्या मनात रेंगाळत राहतात.

खूप दिवसांनी आज संध्याकाळ

माझ्या खिडकीशी निवांत थांबली

आणि नकळत तुझ्या नावाचा सुगंध घेऊन आली '

 

खूप बोललो आम्ही एकमेकांशी

शब्द नाही 

पण भावनांच्या कल्लोळाशी

 

जेवढ्या मावळतीच्या छटा

तिने आभाळभर पसरवल्या,

तेवढ्याच तुझ्या आठवणी

मनात गडद होत गेल्या...

 

उर दाटून आला होता

डोळे थोडे पाणावले

माझ्या काळजीने संध्येने परत जाणे हि नाकारले

 

मी म्हटलं तिला - जा बाई त्या सूर्य मागे ,एकटा सोडू नको त्याला ,

घरी परतत असताना, सोबत तुझीच तर असते त्याला...

 

ती फक्त मंद हसली...

 

आणि निघून जाताना

माझ्या ओंजळीत

तुझ्या आठवणींचा

एक संधिप्रकाश ठेवून गेली.

गौरी


शनिवार, २० जून, २०२६

🌧️ पावसाच्या रंगात चिंब

 



🌧️ पावसाच्या रंगात चिंब

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ...
मातीचा मंद धुंद सुगंध...
आणि मनाला भिजवून टाकणारा पाऊस...

काजळलेल्या ढगांनी दाटलेलं आभाळ, पावसाचा निरोप घेऊन येणारा गार वारा, दुपारीही संध्याकाळ झाल्याचा भास आणि मातीचा मंद धुंद सुगंध... एक-एक थेंब पडायला सुरुवात होते. मग रिमझिम सर येते आणि क्षणार्धात ताशासारखा कोसळणारा पाऊस सुरू होतो.

या सगळ्या वातावरणाबरोबर मनही चिंब भिजून जातं. उन्हाळ्याच्या अस्तित्वाची एकही खूण मागे न ठेवता तो आपल्या आगमनाने सगळा शीण विसरवून टाकतो. फुलांपासून माणसांपर्यंत, पशुपक्ष्यांपासून सृष्टीतील प्रत्येक जीवाला तो आपल्या रंगात रंगवून टाकतो, भिजवून टाकतो.

नव्या उमेदीची, नव्या ऊर्जेची आणि आनंदाची चाहूल घेऊन येणारा हा पाऊस केवळ ऋतू नसतो, तर तो एक अनुभव असतो. प्रत्येक सरीसोबत मनाला नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा, आठवणींना ओलावा देणारा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडणारा हा पाऊस मला खूप आवडतो.

“पाऊस फक्त धरतीला भिजवत नाही, तो मनालाही नव्या उमेदीने चिंब करून जातो.” ☔🌿

#पावसाच्यारंगातचिंब #मराठीब्लॉग #पाऊस #निसर्ग #मनोगत 

सोमवार, १८ मे, २०२६

स्पंदन...Vibration..Aura cleaning

 

स्पंदन...Vibration..Aura cleaning  


काही जागा नकाशावर नसतात…
त्या मनाच्या आत दडलेल्या असतात.

 

काही ठिकाणं फक्त पाहिली जात नाहीत…
ती आपल्या आत कुठेतरी कायमची जागी होतात.

 

आपण तिथे फक्त जात नाही,
तर नकळत स्वतःलाच भेटून येतो.

 

त्या रस्त्यांना काही जादू असते का…?
की आपल्या आतच काही हरवलेलं असतं,
जे तिथे गेल्यावर शांतपणे सापडतं —
हे कधीच कळत नाही.

 

तिथला वारा वेगळा नसतो,
आकाशही नेहमीसारखंच असतं…
पण त्या जागेत पाऊल टाकताच
मनावर चढलेली एक अदृश्य धूळ
हलकेच झटकली जाते.

 

मग आपण क्षण क्षण जगू लागतो…
जणू वेळ थोडावेळ मंदावली आहे.

आणि त्या सुंदर क्षणांच्या गर्दीतही
मनाच्या एका कोपऱ्यात
एक शांत जाणीव उभी असते —

“परत जायचं आहे…
पुन्हा त्याच घरात,
त्याच कामात,
त्याच आयुष्यात.”

 

पण कदाचित
हाच त्या प्रवासाचा सर्वात गूढ भाग असतो.

कारण परतताना
जागा बदललेली नसते…
बदललेलं असतं आपलं स्पंदन.

 

काहीतरी मागे
तिथेच राहिलेलं असतं…
आणि काहीतरी नवीन
आपल्या आत जन्माला आलेलं असतं.

 

म्हणूनच काही प्रवास कधीच संपत नाहीत.

आपण घरी परततो…
पण मन अजूनही
त्या जागेच्या शांत प्रतिध्वनीत
हळूच रुंजी घालत राहतं…

 

“प्रवास संपतो…
पण त्या जागेची स्पंदनं
मनात बराच काळ फिरत राहतात.”

 

Gauri Ekbote

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

तेव्हापासून माझी मी न राहिले गं…

 



मनात कितीतरी गोष्टी घेऊन ती त्याला भेटायला गेली होती. त्याच्याशी खूप काही बोलायचं होतं, मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. पण प्रत्यक्षात तो समोर आल्यावर मात्र शब्दच हरवले.

त्याची नजर तिच्या नजरेला भिडली आणि क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटलं. ओठांवर हसू होतं, मनात भावनांचं वादळ होतं… आणि त्या निःशब्द क्षणांतही दोघांमध्ये खूप काही घडून गेलं.

आता ती आपल्या मैत्रिणीसमोर बसली होती. भेट संपली होती, पण तिचं मन अजूनही त्याच क्षणात अडकलं होतं. त्याच्या नजरेत हरवलेली ती, मनात उमललेलं नवं काहीतरी जपत, आपल्या मैत्रिणीला सगळं सांगत होती…

आणि तिच्या तोंडून नकळत शब्द उमटले—


शब्द हरवले, डोळे बोलत राहिले गं

न सांगितलेलं  त्यांच्यापर्यंत  पोहोचविलं. ।।

आर्तता ही मनाची,मनालाच कळाली गं,

ओढ अनामिक एकमेका लागली गं ।।


क्षण तो थांबावा, असंच वाटत राहिलं गं,

त्यांच्या नजरेत माझं मन हे हरवल   ।।

ओठांवर हसू अन् मनात उठलं वादळ  गं  |

अबोल भावनांचा अंतरात हा  कल्लोळ ।।


काही न बोलता खूप काही घडलं गं, 

मनात नातं नवीन एक उमललं ।।

भेट संपली, मन त्या क्षणात हरवलं गं, 

तेव्हापासून माझी मी न राहिले गं… ।।

 

गौरी


शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

✨ जिवाशिवांची जडलेली समाधी ✨



जिवाशिवाची जडली समाधी,
अंतरीची सारी व्याकूळता निवळली.
पडलेले सारे कल्लोळही थांबले,
ना काळ राहिला, ना दिशा ह्या दाही.

श्वासांची ही हरवली ती लय,
देहाच्या आठवणीही गेल्या विझून.
स्वतःचेही न उरले भान—
शून्यातून उमटला एक तो  सूर — श्रीकृष्ण,  श्रीकृष्ण…

विटला प्रपंच, तुटली उपाधी,
मनाची सारी चंचलता थांबली.
निरभ्र शांततेत उमलला एक लय—
मन जाहले आता हरिमय, हरिमय.

— गौरी 

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

अबोल शब्दांचा कल्लोळ

**माझी ओंजळ….**  

_— अबोल शब्दांचा कल्लोळ_  


दाटून आलेल्या मनात,  

भावनांचा कल्लोळ…  


ओठांनी मात्र निवडला मार्ग तो — अबोल,  

शब्द जणू विसरले ओठांच्या वाटा.  


मनातल्या गोष्टी, मनातच रुतल्या आता,  

नजरेत कधी असतात कथा अंतरीच्या.  


तर कधी आसवे सांगतात — वेदना जिव्हाळ्याच्या.  

कागदावर उतरू पाहतात कितीतरी विराणी,  


पण गोठते लेखणी अन हरवते  

शब्दांची शिदोरी…  


गौरी  

बुधवार, १८ जून, २०२५

वारी निघाली बघा, ओढ जीवाला तेजाची

 

विठ्ठल विठ्ठल, चैतन्याचा जयघोष

टाळ मृदूंगाची साथ, वारकऱ्यांचा जल्लोष  ।।

 

साथ ज्ञानोबा तुकोबाची , आस विठूला पहायची

वारी निघाली बघा,  ओढ जीवाला तेजाची  ।।

 

भाळी चंदन टिळा , मुखी हरिनामाच्या हो माळा

भजन कीर्तनाच्या ओव्या , वारी हा आनंदाचा सोहळा ।।

 

 काय वर्णू वेळापूर महिमा ,भक्तराज धरती  रिंगणा

धूळ उडे ती पावन माती , तेज असे  त्या घोड्याच्या पाठी ॥

अभीर धुळी लोळे भगवाधारी , अलौकिक असे हरे एक वारी

ओढ आवरेना भेटण्या मुरारी , धावतो बघा हर एक माळकरी  ।।

 

एका वर्षाने बघा भेटली ती माय , शब्द गोठले ओठात  मनी  भावनांना पूर ,

डोळा आसवांची दाटी माय लेकराच्या भेटी , पंढरपुरात ह्या मज भेटला श्रीहरी ||

  

Gauri Ekbote